कोरोना : भय नको सजगता हवी....
सध्याची कोरोनाची परिस्थिती अत्यंत भयावह आहे. आपण आता दुसऱ्या कम्युनिटी स्प्रेडच्या लाटेमध्ये आहोत. महाराष्ट्रात कोरोनाच्या जवळपास पन्नास हजारांहून अधिक केसेस दररोज येत आहेत. परिस्थिती अशी आहे की रोज पेपर मध्ये, व्हाट्सअपवर किंवा सोशल मीडियामध्ये मृत्यूच्या आणि श्रद्धांजली च्या बातम्या पाहून-ऐकून मन खिन्न, विषन्न होत आहे. कितीतरी जवळचे नातेवाईक, मित्र, स्नेहीजन आपण गमावत आहोत.
या
वेळेचा कोरोना फार भयानक आहे. मागील लाट आणि या वेळच्या लाटेमध्ये खूप फरक आहे. या
वेळेच्या लाटेमध्ये आपण पाहिले तर कोरोना बहुरुप्या सारखा रुप बदलून येत आहे.
यावेळेसच्या लक्षणात थोडाफार बदल, वेगाने
प्रसार आणि मृत्यूदर ही खूप जास्त आहे. Oxygen Bed,ICU बेड व औषधींचा तुटवडा व त्यातून रुग्णांची व नातेवाईकांची
होणारी हालअपेष्टा ही अत्यंत खेदजनक व वेदनादायी बाब आहे. रुग्ण झपाट्याने गंभीर
होत आहेत.
रोज वाढणाऱ्या केसेस व मृत्यू पाहता
स्मशानभूमीतही प्रतीक्षा यादी लागते आहे. घडू नये ते घडतं आणि कोरोनाचं मरण पाहून
सरण सुद्धा रडतं।। अशा दुर्दैवी परिस्थितीचा सामना आपण करत आहोत. शासन-प्रशासन, आरोग्य यंत्रणा, इतर
सेवाभावी संस्था, मीडिया इ. अनेक जण या
कोरोना नियंत्रणासाठी गेल्या एक वर्षापासून सतत झटत आहेत आणि अनेक संघटना हतबल, असाह्य झाल्या आहेत. आरोग्य व्यवस्थेवर प्रचंड ताण आलेला
आहे. अखंड, अविरत
व अथक परिश्रम या सर्व संस्थांमार्फत होत आहेत तरी पण कोरोना नियंत्रणात
येत नाही.
अख्खं
जग कोरोनाच्या विळख्यात अडकले आहे. राज्यात हा वेगाने वाढणारा कोरोना संसर्ग व
मृत्युदर पहाता ही आरोग्य आणिबाणी वाटते. प्रत्येकाच्या आयुष्यातील
ही पहिलीच मोठी साथ समजायला पाहिजे. आपण यावर नियंत्रण का आणू शकत नाही हा चिंता
आणि चिंतनाचा विषय आहे. मागील एक वर्षापासून जनजागरण केले असले तरी अजूनही
जागरुकता येत नाही. बेफाम, बेलगाम, बेजबाबदारपणे लोकं रस्त्यावर शासकीय सूचना नियम चे पालन न
करता राजरोसपणे पणे फिरत असतात आणि इतरांना ते या साथीच्या आजाराचा प्रसार देत
असतात. या साथीच्या आजारांसाठी अनेक जण डॉक्टरांकडे जातात आणि त्यांना कोरोनाची
टेस्ट करा म्हटलं की त्यांची टेस्ट करायची मनाची तयारी नसते.
समाजातील अप्रशिक्षित किंवा कोव्हिडं विषयी पुरेसे ज्ञान नसलेल्या व अनुभवाचा
अभाव असलेल्या काही मंडळी कडून सौम्य लक्षणे असलेले रुग्ण तपासून घेतात व औषधोपचार
सुरू होतो पण या दरम्यान कालावधीत वेळ जाऊन पुढे रुग्ण गंभीर अत्यवस्थ होत असल्याचे
निदर्शनास आले आहे. त्यामुळे वेळ न दवडता लक्षणे जाणवताच रुग्णाने तात्काळ
कोव्हिडं विषयी तज्ञ डॉक्टरां कडून मार्गदर्शन घ्यावे व तपासण्या करुन घ्याव्यात.
मी शेतात राहतो, मला
कोरोना होऊ शकत नाही, मी
थंड पाणी प्यायलो,मला उन लागले, मी पंख्याखाली बसलो, मी
कुलरला बसलो होतो म्हणून सर्दी झाली... असे थातूरमातूर उत्तर देत असतात .निदान न
स्वीकारणे ही हल्ली रुग्णांची प्रवृत्ती झाली आहे. त्यांना मी गेल्या काही
महिन्यांपासून पाहत आहे. यामध्ये या महिन्यात तर मृत्यूदरानं उच्चांक गाठलाय, यासाठी सर्वस्वी आपणच जबाबदार आहोत. ही परिस्थिती खूप भयावह
आहे. यातून मार्ग नाही काढला तर आपण कुणीकडे जाऊ हे निश्चित सांगता येत नाही.
आजपर्यंत असं होतं की जो जीता वही सिकंदर... पण
दुर्दैवानं साथ अशीच राहिली तर, जो
जिंदा वही सिकंदर म्हणायची वेळ आपल्यावर येईल.
