आला उन्हाळा………….. तब्येत सांभाळा!

                     सध्या पारा चांगलाच तापलाय. होळी पार पडली की उन्हाळा सुरू झाला असे मानले जाते. होळीमध्ये थंडी जळून जाते. मग उरते ती केवळ उष्णता. ही उष्णता शरीरातही वाढते आणि बाहेरदेखिल. म्हणून शरीराची काळजी दोन्ही बाजूंना घ्यावी लागते. उन्हाळा म्हणजे उकाडा, घाम, चिकटपणा आणि त्यासोबत येणारे वेगवेगळे आजार. असं काहीसं चित्र आपल्या डोळ्यासमोर उभं राहतं. त्यामुळे अनेकांना उन्हाळा नकोसा होतो. अशावेळी उष्णतेच्या त्रासापासून बचाव करण्यासाठी काळजी घेण्याची गरज आहे.

                         उन्हात फिरण्याचे टाळणे आणि शरीरातील पाण्याचे प्रमाण कायम राहील यासाठी प्रयत्न करणे, हाच उन्हाळ्यात आरोग्य सांभाळण्याचा सर्वात चांगला उपाय आहे. मात्र उन्हातून फिरण्याची वेळ आल्यास डोळे, डोके व शरीर यांना संरक्षण देणे गरजेचे आहे; तसेच उन्हातून फिरून आल्यानंतर थंड पेय लगेच पिण्याचे टाळावे. उन्हाळ्यातील आजार टाळण्यासाठी खबरदारी घेतली पाहिजे. गाड्यांवरील उघडे अन्नपदार्थ खाऊ नयेत. पाण्यासोबतच पातळ पदार्थाचं सेवन वाढवावं. स्वच्छ पाणी प्यावं. ताक, लिंबू, सरबत प्यावं. जड आणि तिखट मसालेदार तळलेले पदार्थ खाऊ नयेत. सहज पचणारं हलकं भोजन घ्यावं. साखर मीठाचं पाणी प्यावं, खाण्यापूर्वी हात स्वच्छ करावेत. उन्हाळ्यात ताप किंवा डोके दुखत असल्यास पॅरॅसिटामोल किंवा क्रोसिनसारखी औषधं स्वत:हूनच घेऊ नये. डॉक्टरांच्या सल्लाने अँण्टीबायोटीक औषधे घेणे केव्हाही चांगले. ताप अधिक असल्यास कपाळावर पाण्याच्या पट्टय़ा ठेवल्यास आराम मिळतो. क जीवनसत्त्व, आँण्टिऑक्सिडंट, , सी, बी यांचं प्रमाण वाढवावं. यामुळे प्रतिकार क्षमता वाढते.

                                उन्हाळ्यात डोळ्यांची विशेष काळजी घेणे जरूरीचे असते. चटके देणा-या उन्हामुळे डोळ्यांची आग-आग होऊ शकते. उन्हाळ्यात घेण्यात येणारा गॉगल हा त्याच्या काचा शास्त्रशुद्ध आहेत हे तपासून घ्यावा. दिवसातून दोन-तीन वेळा डोळे स्वच्छ पाण्याने धुवावेत.