अभ्यास + मोबाईल = परीक्षा


                   प्रत्येक विद्यार्थ्यांच्या जीवनात यशवंत होण्यासाठी परीक्षा द्यावी लागते. परीक्षेत यश संपादन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी अभ्यास कसा करावा हे शास्त्र आत्मसात केले पाहिजे. केवळ उद्या परीक्षा म्हणून आदल्या दिवशी रात्रभर अभ्यास करून चालणार नाही. तर वर्षभर प्रत्येक विषयाच्या अभ्यासाचे नियोजन करून नियमित अभ्यास केला पाहिजे. यासाठी उद्यापासून म्हणण्यापेक्षा आजपासून अभ्यासाला लागणे आवश्यक आहे. आयुष्याला कलाटणी देणारी परीक्षा म्हणून दहावी आणि बारावीच्या परीक्षेकडे बघितले जाते. दोन्ही परीक्षा पुढच्या करीअरसाठी महत्त्वाच्या असल्याने विद्यार्थ्यांपेक्षाही पालकांना मोठी चिंता लागून असते. परिणामी, सारखे विद्यार्थ्यांवर गुणांचे ओझे टाकले जाते. त्यामुळे विद्यार्थी गोंधळून जातो.  नेमके परीक्षेच्या काळातच विद्यार्थ्याला नैराश्‍य येत असल्याने हवे तितके गुण पडत  नाही. परंतु, परीक्षेपूर्वीच जर वेळापत्रकानुसार अभ्यास केला तर, सहजतेने परीक्षेमध्ये अपेक्षेपेक्षा अधिक गुण मिळू शकतात.

                
प्रत्येक विषयाचा अभ्यास आवडीने आणि मनापासून करावा. जो विषय समजत नाही किंवा अवघड वाटतो, त्या विषयास अधिक वेळ द्यावा. तो विषय किंवा ती प्रश्नोत्तरे दोन-तीन वेळा वाचावीत. नंतर त्यावर वर्गातील हुशार विद्यार्थी आणि त्या विषयाचे शिक्षक यांच्याशी चर्चा करावी.प्रत्येक विषयाचा नेमून दिलेला अभ्यासक्रम, पेपर पॅटर्न व परीक्षेचा कालावधी यांची अचूक माहिती करून घ्या.व्याख्या, सुत्रे, नियम यांसारखे महत्त्वाचे मुद्दे मात्र शब्दशः आत्मसात करा. ते मोठ्या अक्षरांत लिहून सतत नजरेस पडतील अशा ठिकाणी लावा. महत्त्वाच्या मुद्यांची रोज उजळणी करा. मागील वर्षाच्या प्रश्‍नपत्रिका समोर ठेवून त्यांचे नीट वाचन करा. प्रत्येक युनिटवर आधारित कोणते प्रश्‍न विचारले गेले आहेत त्यांची यादी करा. संपूर्ण पुस्तक किंवा नोट्‌सचा अभ्यास करण्यापेक्षा अशा महत्त्वाच्या प्रश्‍नांची उत्तरे तयार करण्यावर भर द्यावा.

                मागील पंधरा वर्षापासून विद्यार्थ्यांच्या हातात असणा-या पुस्तकाची जागा मोबाईलने घेतली आणि त्यापासून हळूहळू पुस्तकांच्या वाचनाकडे दुर्लक्ष होऊन त्याची जागा व्हॉट्सअ‍ॅपने घेतली आहे. व्हॉट्सअ‍ॅपमुळे काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी आत्महत्या केलेल्या आहेत, तर काही विद्यार्थी मनोरुग्ण झालेले आढळले आहेत. इतकी पकड मोबाईलने केली आहे. सध्या तर तीन महिन्यांसाठी ३९९ रुपयांमध्ये प्रत्येक दिवशी एक जीबी डेटा मोफत व कितीही बोलता येते. कदाचित ही सेवा स्वस्त वाटत असली तरी त्यामुळे विद्यार्थ्यांचे मानसिक संतुलन बिघडू लागले आहे. हे मुलांनी टाळले पाहिजे. नंतर, आई-वडिलांना दोष देण्यापेक्षा याचे दुष्परिणाम लक्षात घेतले पाहिजेत. ज्या विद्यार्थ्यांनी आई-वडील व गुरुजनांचा आदर केला ते विद्यार्थी प्रामाणिकपणे अभ्यासाच्या मागे लागून आज आरामदायी जीवन जगत आहेत. तर ज्यांनी अभ्यासाकडे पाठ फिरवली ते आज व्यसनाच्या आहारी गेलेले दिसतात. त्यासाठी विद्यार्थ्यांच्या भविष्यकाळासाठी शिक्षण खूप उपयोगी आहे.