त्वचेवर होणारा रंगांचा परिणाम...
धुलीवंदन व रंगपंचमीनिमित्त बहुतांश ठिकाणी रासायनिक रंगांची उधळण केली जाते. त्यामुळे आरोग्यावरही घातक परिणाम होतो. रंगामुळे डोळे सुजणे, तात्पुरता आंधळेपणा, कॅन्सर, त्वचेचे आजार असे विविध त्रास उद्भवू शकतात.
नैसर्गिक घटकांपासून तयार केलेल्या रंगांची जागा रासायनिक रंगांनी घेतली. त्या तुलनेत स्वस्त आणि दीर्घकाळ टिकणारे रंग सर्रास विकले जात आहेत. ओले रंग, पेस्ट, पावडर आणि वॉरनिशचा रंगपंचमीनिमित्त उपयोग वाढला. मात्र, त्याचे परिणाम ऐकले तर कोणाचाही थरकाप उडेल. या रंगांमध्ये शरीरासाठी अत्यंत घातक ऑक्साइड, कॉपर सल्फेट, ऍल्युमिनिअम ब्रोमाइड, पर्शियन नीड, मर्क्युरी सल्फाइड आदी विषारी रसायने असतात. या रसायनांमुळे हे रंग अधिक गडद होतात व दीर्घकाळ टिकतात. या रंगांचे काही परिणाम तत्काळ दिसून येतात, तर काही दीर्घकाळाने जाणवतात. या रंगांमुळे त्वचेची आग होते तर डोळ्यांची जळजळही तत्काळ जाणवते. मात्र, दूरगामी परिणाम यापेक्षा गंभीर आहेत.
रासायनिक रंगांमुळे त्वचेचे विविध आजार होऊ शकतात. डोळ्यांना सूज व तात्पुरतेच आंधळेपणा यासारखे घातक परिणाम होऊ शकतात. सोबतच त्वचेचा कर्करोगही या रंगांमुळे होऊ शकतो. मात्र, जल्लोषाच्या तयारीत असलेली मंडळी त्याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करते. यंदा नैसर्गिक रंगाची रंगपंचमी साजरी करा अन् आरोग्याचीही काळजी घ्या.
रंग खेळताय, हे करा
० रंग खेळायला बाहेर जाण्यापूर्वी शरीराला खोबरेल तेल किंवा गोडतेल लावायला हवे.
० रंग खेळण्याच्या आधी केसांना तेल लावायला पाहिजे. त्यामुळे केसांना रंग लागणार नाही.
० ऑईल पेंट किंवा बाजारात मिळणारे रसायनयुक्त रंग वापरू नयेत. त्याऐवजी कोरडा गुलाल, हळद किंवा केशरी रंगाचा वापर करावा.
० गुलाबपाणी आणि मुलतानी माती एकत्र करून लावली तर रंगाच्या अॅलर्जीचा त्रास होत नाही.
० डोळ्यांची जळजळ होत असल्यास थंड पाण्याने धुवावे. यानंतरही जळजळ सरूच असल्यास थंड पाण्याच्या पट्टय़ा डोळ्यावर ठेवाव्यात.
० डोळ्याला इजा झाल्यास, शरीरावर खाज सुटल्यास किंवा अॅलर्जी झाल्यास त्वरित जवळच्या रुग्णालयात जावे................

